अर्थवृद्धीत भारत चीनपेक्षा पुढे, आयएमएफचा अंदाज

0
2

२०१८- १९ या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या आर्थिक विकासाबाबतचा अंदाज कायम ठेवला आहे. २०१८- १९ या चालू आर्थिक वर्षात विकास दराची वाढ ७. ३ टक्के इतकी राहील. तर २०१९- २० या पुढील आर्थिक वर्षात ही वाढ ७.४ टक्के राहण्याचा अंदाज आयएमएफने वर्तवला असून विशेष म्हणजे याबाबतीत भारत चीनपेक्षा पुढे असेल, असेही आयएमएफने म्हटले आहे.
आयएमएफने वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूकमध्ये जागतिक अर्थवृद्धीबाबत अंदाज वर्तवला आहे. २०१८- १९ या आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकास दराची वाढ ७.३ टक्के इतकी राहील, असा अंदाज वर्तवला आहे. तर २०१९ – २० या आर्थिक वर्षात विकास दराची वाढ ७.४ टक्के इतकी राहील, असे म्हटले आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या अहवालात आयएमएफने २०१९ – २० या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दराची वाढ ७.५ टक्क्यांनी होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे आधीचा अंदाज सुधारुन नवीन अहवालात २०१९ -२० मध्ये आर्थिक वाढ काही प्रमाणात मंदावेल, अशी शक्यता आयएमएफने वर्तवली आहे. कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ आणि जागतिक स्तरावरील प्रतिकूल आर्थिक स्थिती याचा फटका काही प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार असून त्याचे प्रतिबिंब या अंदाजात उमटले आहेत.

दुसरीकडे जागतिक स्तरावर चीनची मात्र पिछेहाट सुरु असल्याचे दिसते. आयएमएफने २०१९ – २० या आर्थिक वर्षाकरिता चीनचा आर्थिक विकास दर वाढ ६.४ टक्क्यांवरुन घसरुन ६.२ टक्क्यांवर येईल असा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापारी युद्धाचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे यातून दिसते. या व्यापार युद्धामुळे अमेरिकेने चीनवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. चीनची अर्थव्यवस्था मुख्यत: निर्यातीवर अवलंबून असल्यामुळे या निर्बंधांचा थेट परिणाम चिनी अर्थव्यवस्थेच्या वाढीवर दिसेल, असेच आयएमएफचा अहवाल सांगतो.