‘राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशाला?’- प्रकाश आंबेडकर

0
3

परभणी- देशाचे स्वतंत्र असे एक राष्ट्रगीत असताना वंदे मातरम्’ची सक्शी कशाला? असा सवाल करत MIM पक्षाप्रमाणे आमचाही ‘वंदे मातरम्’ला विरोधच आहे. राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे मित्रपक्ष ‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध आहे असे मत आंबेडकर यांनी परभणीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकाश आंबेडकर काल मातंग समाज सत्ता संपादन परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ‘वंदे मातरम्’ संदर्भात प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ‘वंचित बहुजन आघाडीचा भाग असणाऱ्या असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमचा ‘वंदे मातरम्’ला विरोध आहे. तर त्यासंदर्भात तुमची भूमिका काय?’, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना ‘राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना वर्चस्ववादी पक्ष
आम्ही स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला ओबीसी, मुस्लिम व दलित वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आम्ही लोकसभेला सर्वाधिक दलित, बारा बलुतेदार व ओबीसीतील लहान घटकांतील लोकांना लोकसभेची उमेदवारी देणार आहोत. आम्ही MIM सोबत हातमिळवणी केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेसारख्या मोठ्या व वर्चस्ववादी पक्षांनी आम्हाला जातीयवादी ठरवले व जाती-धर्माचा उल्लेख केला. अशा प्रवृत्तीच्या पक्षांचा व लोकांचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या चारही मोठ्या पक्षांची मानसिकता वर्चस्ववादी असल्याचे आरोप आंबेडकरांनी केला.