सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती अन् शिवाजी महाराजांचं शौर्य होते – पंतप्रधान मोदी

0
17

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

अहमदाबाद : भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती अन् शिवाजी महाराजांचं शौर्य होते, असे यावेळी बोलताना मोदी म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 143 वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधून या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे लोकार्पण करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची 182 मीटर आहे.

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात हा पुतळा उभारण्यात आला असून त्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मोदींनी पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर हवाई दलाची तीन विमानांनी तिरंगी ध्वजाच्या रंगांची उधळण करण्यात आली. या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित होते.

सरदार पटेल यांचा हा भव्य पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे काम 2013 साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते, ते आता पूर्ण झाले आहे. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.

काय म्हणाले मोदी..?
– देशाची एकता जिंदाबाद जिंदाबाद!
– देशाच्या इतिहासात आज महत्त्वाचा दिवस- नरेंद्र मोदी
– सरदार पटेल यांचा भव्य पुतळा देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.
– गुजरातच्या शेतकऱ्यांकडून या पुतळ्याच्या निर्मितीला जनआंदोलनाचे स्वरुप दिले, त्यांच्याकडून मिळालेल्या अवजारांमुळे पुतळ्यासाठी शेकडो टन लोखंड मिळाले.
– सरदार साहेबांच्या आवाहनावर देशाच्या शेकडो संस्थानांनी त्याग केला, त्यांचा त्याग विसरता येणार नाही.
– देशातील काही लोक आमची ही मोहीम राजकारणाशी जोडू पाहतात तेव्हा आश्चर्य वाटतं.
– सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांचे कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका केली जाते, महापुरुषांचं कौतुक करणे हा मोठा गुन्हा आहे काय?
– सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती अन् शिवाजी महाराजांचं शौर्य होते.