ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळाने निधन

0
5

वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे | ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 79 व्या वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. उद्या 11 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.

आपल्या बहारदार अभिनयाने जवळ जवळ 5 दशकांचा काळ गाजवत रंगभूमीवर आपला आगळा ठसा उमटवणाऱ्या बंडखोर अभिनेत्री ही लालन सारंग यांची खरी ओळख होती.

लालन सारंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1941 रोजी गोव्यात झाला. लालन सारंग यांनी मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून अभिनय प्रवासाला सुरुवात केली. ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, उद्याचा संसार’ आदी नाटकांचा यात समावेश होता. विजय तेंडूलकर यांच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली. ‘रथचक्र’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’ आदी नाटकातल्या भूमिका गाजल्या. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’या चित्रपटांत तसेच ‘रथचक्र’या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले. नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून त्यांनी केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष होता.

सारंग यांच्या गाजलेल्या कलाकृती
> आक्रोश (वनिता)
> आरोप (मोहिनी)
> उद्याचा संसार
> उंबरठ्यावर माप ठेविले
> कमला (सरिता)
> कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)
> खोल खोल पाणी (चंद्राक्का)
> गिधाडे (माणिक)
> घरकुल
> घरटे अमुचे छान (विमल)
> चमकला ध्रुवाचा तारा
> जंगली कबुतर (गुल)
> जोडीदार (शरयू)
> तो मी नव्हेच
> धंदेवाईक (चंदा)
> बिबी करी सलाम
> बेबी (अचला)
> मी मंत्री झालो
> रथचक्र ( ती)
> राणीचा बाग
> लग्नाची बेडी
> सखाराम बाइंडर (चंपा)
> संभूसांच्या चाळीत
> सहज जिंकी मना (मुक्ता)
> सूर्यास्त (जनाई)
> स्टील फ्रेम (हिंदी)