मुख्‍यमंत्र्यांनी मनेका गांधींची मागणी फेटाळली; म्‍हणाले, मुनगंटीवारांचा राजीनामा मागणे चुकीचे

0
5

मुंबई | अवनी वाघिणी मृत्‍यू प्रकरणी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची मागणी फेटाळून लावली आहे. मनेका गांधी यांनी वनखात्‍याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी मुख्‍यमंत्र्यांकडे केली होती. मात्र या प्रकरणात मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे, असे म्‍हणत मुख्‍यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. मात्र या प्रकरणामुळे प्रथमच भाजपचे क्रेंदीय मंत्री व राज्‍यातील मंत्री एकमेकांविरोधात उभे ठाकले असल्‍याचे दिसत आहे.

वनमंत्री मुनगंटीवार यांनीही ‘वनखात्‍याला वाघिणीला मारण्‍याची हौस नव्‍हती. याप्रकरणी आमची राष्‍ट्रीयच काय आंतरराष्‍ट्रीय चौकशी करा. मात्र चुकीचे आरोप करून वनखात्‍यातील कर्मचा-यांचे मनोबल कमी करू नका’, असे म्‍हणत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना प्रथमच चोख प्रत्‍युत्‍तर दिले होते. दुसरीकडे अवनी वाघीण शिकार प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत अवनीसंदर्भातला मुद्दा उपस्थित करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना धारेवर धरण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वनविभागाच्या पथकाने बोराटीच्या जंगलात गोळ्या घालून ठार केले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिने वन विभागाच्या चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली, असे स्‍पष्‍टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. तर मुख्‍यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे.