भारत-विंडिज सामन्‍याच्‍या एका रात्री आधीच योगींनी बदलले स्‍टेडियमचे नाव, राज्‍यपालांनीही दाखवली तत्‍परता

0
6

लखनऊ | सत्‍तेत आल्‍यानंतर आतापर्यंत उत्‍तर प्रदेशातील डझनभराहून अधिक शहरांची नावे बदलणा-या योगी आदित्‍यनाथ यांनी आता स्‍टेडियमची नावे बदलायलाही सुरूवात केली आहे. भारत-वेस्‍ट विंडिजमधील दुसरा टी-20 सामना आज लखनऊतील ‘इकाना’ स्‍टेडियमवर होत आहे. मात्र, सामन्‍याच्‍या एक दिवस आधीच योगी सरकारने या स्‍टेडियमचे नाव बदलले आहे.

विशेष म्‍हणजे सामना सुरू होण्‍याच्‍या एका रात्री आधीच योगी सरकारने नाव बदलण्‍याची पक्रिया सुरू केली व रात्रीच ती यशस्‍वीरीतया संपवली. इकाना स्‍टेडियमचे नाव आता ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम’ असे ठेवण्‍यात आले आहे. रात्रीच यासंबंधीचा प्रस्‍ताव मंजुरीसाठी राज्‍यपालांकडे पाठवण्‍यात आला होता. राज्‍यपालांनीही तत्‍परता दाखवत तातडीने याला मंजुरी दिली. नंतर आज सकाळी अधिकृतरीत्‍या पत्रकाद्वारे उत्तर प्रदेश सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्‍यानंतर योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत नामांतराचा छोटासा सोहळाही स्‍टेडियममध्‍ये पार पडला.