शबरीमला मंदिर आज विशेष पूजेसाठी खुले होणार, महिला पत्रकारांना बंदी

0
5

शबरीमला – आज सोमवारी शबरीमला मंदिर विशेष पूजेसाठी खुले करण्यात येणार आहे. त्‍यामुळे या घटनेचे वार्तांकन करण्‍यासाठी माध्‍यमे शबरीमाला मंदिर परिसरात तळ ठोकून आहेत. मात्र महिला पत्रकारांना वार्तांकनासाठी पाठवू नका, अशी विनंती शबरीमला कर्म समितीन प्रसारमाध्यमांना केल आहे.

भगवान अयप्पा मंदिर आज काही तासांसाठी खुले करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केरळ सरकारने २३०० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मंदिर परिसरात तैनात केला आहे. त्यात कमांडो पथक आणि शंभर महिला कर्मचारीही सहभागी आहेत.

शबरीमला येथील विशेष पूजेचं वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकारांना पाठवू नये, असे आवाहन येथील हिंदू संघटनांनी केले आहे. गेल्या महिन्यात महिला पत्रकारांशी गैरवर्तणूक आणि प्रसारमाध्यमांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून शबरीमला कर्म समितीने संपादकांना पत्र लिहले आहे. संस्थेतील महिला पत्रकारांना वार्तांकनासाठी पाठवू नये. मंदिरात प्रवेश केल्यानं परिस्थिती आणखी चिघळू शकते, असे या पत्रात म्हटले आहे. गरज भासल्यास विभागीय निरीक्षक आणि उपनिरीक्षक श्रेणीतल्या ३० महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येईल, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.