ऊसाच्‍या एफआरपीवरून स्‍वाभिमानी आक्रमक, सांगलीत साखर कारखान्‍यांत जाळपोळ

0
7
वाळवा तालुक्‍यातील भडकंबे येथे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉली संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी गुरूवारी रात्री पेटवून दिल्‍या.

सांगली | ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकरी स्‍वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी गुरूवारी रात्री वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील कारखान्याचे विभागीय कार्यालय पेटवून दिले आहे. तसेच वाळवा तालुक्‍यात ऊस वाहतूक करणा-या दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींना भररस्‍त्‍यात कार्यकर्त्‍यांनी पेटवून दिले. यामुळे सांगली जिल्‍ह्यात ऊसदरासाठी सुरू असलेले आंदोलन चिघळले आहे.

उसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये दर मिळावा, दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चार दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी संघटनेने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढून कारखान्यांच्या व्यवस्थापनास निवेदन दिले होते. मात्र व्‍यवस्‍थापनांनी आंदोलनाची दखल घेतली नाही व कारखाने लवकरच सुरू करण्‍याच्‍या हालचाली चालू केल्‍या. यामुळे भडकलेल्‍या कार्यकर्त्‍यांनी वसंतदादा आणि राजारामबापू पाटील कारखान्याची विभागीय कार्यालये पेटवून देऊन कारखाने बंद ठेवण्याचा एकप्रकारे इशारा दिला आहे.